भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. या मालिकेतील चमकदार कामगिरीचा फायदा भारतीय खेळाडूंना आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत झालेला दिसतोय. भारतीय संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi) याने त्याची संघातील निवड सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले... २३ वर्षीय गोलंदाजाने याच जोरावर आज ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ गोलंदाजाचा बहुमान पटकावला. या मालिकेपूर्वी पाचव्या क्रमांकावर असलेला बिश्नोई आज ६९९ रेटींग पॉईंटसह अव्वल स्थानी बसला आहे.
फेब्रुवारी २०२२ पासून पदार्पण केल्यानंतर बिश्नोईने २१ ट्वेंटी-२० सामन्यांत ३४ विकेट्स घेतल्या आहेत. २०२०मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखाली वर्ल्ड कप स्पर्धेत बिश्नोईने सर्वांचे लक्ष वेधले होते. भारतीय संघ उपविजेता राहिलेल्या त्या स्पर्धेत बिश्नोईने सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या होत्या. पण, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि आर अश्विन हे असल्यामुळे बिश्नोईला फार संधी मिळाली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं. बिश्नोईने अफगाणिस्तानचा स्टार राशिद खानला मागे टाकले. आदिल राशिद, वनिंदु हसरंगा हे संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत, तर महीश थिक्षणा पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा अक्षर पटेल १६व्या क्रमांकावरून ११व्या स्थानी आला आहे.
फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम आहे, तर ऋतुराज गायकवाड सातव्या क्रमांकावर आहे. यशस्वी जैस्वालने १६ स्थानांच्या सुधारणेसह १९ व्या क्रमांकावर आला आहे.