Ruturaj Gaikwad Ranji Trophy : भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. असे असतानाही त्याला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. पण, आता ऋतुराजवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रणजी ट्रॉफी २०२४-२५ साठी ऋतुराजला महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने संघ जाहीर केला असून, अर्शीन कुलकर्णी आणि राहुल त्रिपाठी यांचाही त्यात समावेश आहे.
शुबमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अलीकडेच झिम्बाब्वे दौरा केला. हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध गायकवाडने चमकदार कामगिरी केली होती. त्याने एका सामन्यात नाबाद ७७ धावा केल्या होत्या. याशिवाय एका सामन्यात ४९ धावांची खेळी करण्यात त्याला यश आले. ऋतुराज गायकवाडने भारताकडून २३ ट्वेंटी-२० सामने खेळले असून, ६३३ धावा केल्या आहेत. तसेच त्याला सहा वन डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
ऋतुराजच्या नेतृत्वात 'महाराष्ट्र'
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील महाराष्ट्राच्या संघात अर्शीन कुलकर्णी आणि राहुल त्रिपाठी यांचाही समावेश आहे. याशिवाय सचिन धस, सिद्धेश वीर, निखिल नायक, अंकित बावणे आणि दिग्विजय पाटील यांनाही संधी मिळाली. सौरभ नवले, मंदार भंडारी, हितेश वाळुंज, विकी ओत्सवाल आणि सत्यजित भाचाव हेही ऋतुराजच्या संघात असतील. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचा पहिला सामना जम्मू-काश्मीरविरुद्ध आहे. हा सामना ११ ऑक्टोबरपासून खेळवला जाईल.
दरम्यान, श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून काही वरिष्ठ खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. पण, ऋतुराज गायकवाडला एकाही संघात स्थान नसल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. मागील सात ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऋतुराजच्या नावाची नोंद आहे. ऋतुराजने त्याच्या शेवटच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५६ धावा केल्या आहेत. या यादीत यशस्वी जैस्वाल (२६३ धावा) दुसऱ्या, शुबमन गिल (२०१ धावा) तिसऱ्या, कर्णधार सूर्यकुमार यादव (१९७ धावा) चौथ्या आणि हार्दिक पांड्या १५८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.