नवी दिल्ली : मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या खूप चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऋतुराजने महाराष्ट्राकडून खेळताना उत्तर प्रदेशविरूद्ध दुहेरी शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्जच्या या फलंदाजाने एकाच षटकात ७ षटकार ठोकून विश्वविक्रम केला. ऋतुराजने एकाच षटकांत नो-बॉलच्या साहाय्याने ४३ धावा कुटल्या.
कोण आहे शिवा सिंग? ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात ७ षटकार ठोकलेला गोलंदाज शिवा सिंग आता चर्चेचा विषय बनला आहे. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०१८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला तेव्हा शिवा सिंग भारतीय संघाचा हिस्सा होता. भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात या खेळाडूचा मोलाचा वाटा होता. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात शिवा सिंगने २ बळी घेत विरोधी संघाचे कंबरडे मोडले होते.
३६० डिग्री रोटेशनने केली होती गोलंदाजीशिवा सिंगच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. २०१८ मध्ये सीके नायडू ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना शिवा सिंगने ३६०डिग्री रोटेशनने गोलंदाजी केली होती, तेव्हा शिवाच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवरून गोंधळ झाला होता. पंचांनी त्याच्या चेंडूला डेड बॉल घोषित केले होते, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.
मायकल वॉनने ॲक्शनला दिला होता पाठिंबा३६० डिग्री रोटेशनने गोलंदाजी करणाऱ्या शिवा सिंगला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने पाठिंबा दिला. त्याचवेळी युवराज सिंग ते बिशन सिंग बेदी यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. शिवा सिंगने विजय हजारे ट्रॉफीमध्येही अशीच गोलंदाजी केली होती पण यावेळी पंचांनी चेंडू वैध असल्याचे मान्य केले होते. मुरादाबादमध्ये जन्मलेल्या २३ वर्षीय शिवा सिंगने आतापर्यंत ७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ४.९८ च्या सरासरीने ५ बळी घेतले आहेत. त्याच वेळी ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये त्याने ९ फलंदाजांना बाद केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"