Ruturaj Gaikwad, IPL 2022 GT vs CSK Live: यंदाच्या हंगामातील यशस्वी संघ असलेल्या गुजरात टायटन्स विरोधात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक झळकावले. गेली काही सामने फॉर्मसाठी झगडणाऱ्या ऋतुराजला आजच्या सामन्यात सूर गवसला. त्याने गुजरातच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर माजी कर्णधार आणि BCCIचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा (३), मोईन अली (१), शिवम दुबे (१९) आणि कर्णधार रविंद्र जाडेजा (२२) यांनी फारशी मोठी खेळी केली नाही. पण ऋतुराज गायकवाडने एक बाजू सांभाळून दमदार खेळी केली. त्याने ४८ चेंडूत ७३ धावांची फटकेबाजी केली. त्याने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने खेळी सजवली. ऋतुराजने आपल्या IPL कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. IPLच्या इतिहासात याआधी सौरव गांगुली, मनोज तिवारी, जॉनी बेअरस्टो यांनी आतापर्यंत ७ अर्धशतके झळकावली आहेत. त्या पराक्रमाशी ऋतुराजने बरोबरी केली.
दरम्यान, गुजरातने टॉस जिंकून CSK ला फलंदाजीसाठी बोलावले. चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथप्पा ३ धावा काढून तर मोईन अली १ धाव काढून माघारी परतला. चांगल्या लयीत असलेला शिबम दुबे १९ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर कर्णधार रविंद्र जाडेजा आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने डाव सावरला. ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक ठोकले. पण त्याला शतकाने हुलकावणी दिली. ७३ धावा काढून तो माघारी परतला. रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून २२ धावांची उपयुक्त खेळी केली.