Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताचा महिला व पुरुष क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने शुक्रवारी आशियाई स्पर्धेसाठीच्या दोन्ही संघांची घोषणा केली. आशियाई स्पर्धेदरम्यानच वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार असल्याने भारताने दुसऱ्या फळीच्या खेळाडूंची निवड केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात १८ संघ सहभागी होणार असल्याची शक्यता आहे, परंतु भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळायचे आहे. त्यामुळे फक्त ३ सामने जिंकून भारत सुवर्णपदक जिंकू शकणार आहे.
२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये आशियाई स्पर्धा होणार आहे. बीसीसीआयने त्यासाठी १५ सदस्य आणि ५ राखीव खेळाडू अशा २० खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. भारतीय संघ या स्पर्धेत अव्वल मानांकित म्हणून दाखल होणार आहे आणि त्यामुळे त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. एकूण १८ संघ या स्पर्धेत सहभागी होतील आणि १८ सामने खेळले जाणार आहेत. आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीनुसार संघांना मानांकन दिली जाणार आहेत.
ऋतुराजसह आयपीएल २०२३ गाजवणाऱ्या बऱ्याच युवा खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान दिले गेले आहे. पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग, राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल, कोलकाता नाइट रायडर्सचा रिंकू सिंग यांची या संघात निवड केली गेली आहे. कर्णधार ऋतुराजने भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भारताचा पुरूष संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग ( यष्टिरक्षक); राखीव - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन