झिम्बाब्वेचा खेळाडू सिकंदर रझाने अनेकदा प्रभावी कामगिरी करून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. आता पुन्हा एकदा तो प्रसिद्धीच्या झोतात आला असून आपल्या देशाकडून ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये हॅटट्रिक घेणारा सिकंदर पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या पात्रता सामन्यात हॅटट्रिक घेण्याची किमया साधली. झिम्बाब्वेने रवांडाविरूद्ध (Rwanda vs Zimbabwe) १४४ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात सिकंदर रझाने प्रथम फलंदाजी आणि गोलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावत २१५ धावा केल्या, ज्यात रझाने ३६ चेंडूत ५८ धावांचे योगदान दिले. सिकंदरने ६ चौकार आणि ४ षटकार ठोकून रवाडांविरूद्ध धावांचा डोंगर उभारला. सिकंदर रझाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने २१५ धावा केल्या होत्या. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना रवांडाचा संघ १८.४ षटकांत ७१ धावाच करू शकला. सिकंदरने ३ चेंडूत ३ बळी घेऊन रवाडांच्या फलंदाजीची कंबर मोडली. उत्कृष्ट कामगिरीसाठी रझाला 'सामनावीर'चा किताब देण्यात आला.
सिकंदरची हॅटट्रिक
सिकंदर रझाच्या षटकात रवांडाचे शेवटचे तीन गडी सलग तीन चेंडूंवर बाद झाले आणि झिम्बाब्वेच्या अष्टपैलू खेळाडूची हॅटट्रिक पूर्ण झाली. खरं तर ट्वेंटी-२० मध्ये पहिल्यांदाच झिम्बाब्वेच्या खेळाडूला हॅटट्रिक घेण्यात यश आले. रवांडाविरुद्धच्या या विजयामुळे झिम्बाब्वेची पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची शक्यता वाढली आहे. या सामन्यात हॅटट्रिक घेऊन रझाने एक खास विक्रम नोंदवला. यंदा ट्वेंटी-२० मध्ये सहाव्यांदा 'सामनावीर'चा किताब जिंकण्याची किमया रझाने साधली. या कामगिरीसह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. किंग कोहलीने यावर्षी सहावेळा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला आहे.
सिकंदर पंजाबच्या ताफ्यात कायम
आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने सिकंदर रझाला कायम ठेवले आहे. झिम्बाब्वेच्या रझाने कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२२, पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएलमध्ये खेळून त्याने आपली छाप सोडली. सिकंदर रझामध्ये असलेली अष्टपैली खेळी करण्याची क्षमता पाहून पंजाब किंग्जने त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
Web Title: Rwanda vs Zimbabwe Sikandar Raza has become the first Zimbabwean man to pick up a hat-trick in T20Is, watch here video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.