नीलेश देशपांडे - नागपूर : सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलने भारतीय क्रिकेटला वेगळे वळण दिले. या स्पर्धेद्वारे युवा क्रिकेटपटूंना आपली क्षमता आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली. या जोरावरच भारतीय संघात स्थान मिळविण्याचा नवा आत्मविश्वास त्यांना मिळाला. आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करीत भारतीय संघात स्थान मिळविले. असाच एक प्रयत्न आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युवा अष्टपैलू रियान परागकडून होताना दिसत आहे.
२०१९ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत रियान सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. यावेळी, तो आयपीएल इतिहासामध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची मोठी चर्चा सुरू झाली. वयाची १७ वर्षे आणि १७५ दिवस पूर्ण झालेली असताना त्याने आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले होते. याआधी हा विक्रम संयुक्तपणे राजस्थान रॉयल्सचाच कर्णधार संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांच्या (१८ वर्षे आणि १६९ दिवस) नावावर होता.
तळेगाव येथील राजस्थान रॉयल्स अकादमीमध्ये सराव करीत असलेल्या रियानने ‘लोकमत’शी संवाद साधताना म्हटले की, ‘भारतासाठी खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी मी आयपीएल आणि देशांतर्गत टी-२० स्पर्धेत छाप पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. टी-२० हा माझा आवडता प्रकार आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिल्यानंतर आता मला वरिष्ठ भारतीय संघातून खेळण्याचे वेध लागले आहेत.’
- आयपीएलमधील विक्रमी अर्धशतकाविषयी रियान म्हणाला की, ‘ती एक शानदार खेळी ठरली होती. त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती होती आणि संघाला कोणीतरी खंबीरपणे उभे राहून खेळण्याची गरज होती. आम्ही प्रमुख बळी गमावले होते. संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचा अभिमान आहे.’ रियानचे या खेळीनंतर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेही कौतुक केले होते की, ‘रियानसारखा युवा खेळाडू पटकन शिकला आणि हे चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे. रियानचे भविष्य उज्ज्वल आहे.’