नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील बंदी बीसीसीआयने उठवली. त्यामुळे आता तो भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहत आहे. पण आज अचानक त्याने आजारी आई-बाबांची शपथ घेऊन शंभर कोटींची गोष्ट केल्याचे वृत्त आहे.
एका इंग्रजी प्रसारमाध्यमाला श्रीसंतने एक मुलाखत दिली. यामध्ये श्रीसंतने आपल्या आजारी आई-बाबांची शपथ घेतली. त्याचबरोबर पत्नी आणि मुलांचीही शपथ घेतली आणि एक मोठी गोष्ट त्याने सांगितली आहे.
या मुलाखतीमध्ये श्रीसंत म्हणाला की," भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. ते सत्यातही उतरवले. त्यामुळे मी कोणतीही वाईट गोष्ट कशाला करू. मी माझ्या आजारी आई-बाबांची आणि बायको व मुलांची शपथ घेऊन सांगतो की, मला कोणी शंभर कोटी रुपये दिले असते तरीही मी फिक्सिंगसारखी गोष्ट केली नसती."
बीसीसीआयने श्रीशांतच्या आजीवन क्रिकेट खेळण्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर श्रीशांत संतप्त झाला असून, मी तुमच्याकडे भीक मागत नाही, असे त्याने बीसीसीआयला सुनावले आहे. मी तुमच्याकडे भीक मागत नाही. उदरनिर्वाहाचे साधन परत मागतोय. तो माझा अधिकार आहे. तुम्ही देवापेक्षा मोठे नाहीत असे टि्वट करुन त्याने बीसीसीआयवरील राग व्यक्त केला.
स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला. 34 वर्षीय श्रीशांतवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाला बीसीसीआयने केरळच्या उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. एकदा नाही अनेकदा मी निर्दोष ठरलोय तरी तुम्ही माझ्या बरोबर वाईट करताय. तुम्ही हे सर्व का करताय? ते समजायला आधार नाही असे त्याने दुस-या टि्वटमध्ये म्हटले आहे.
2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतचा सहभाग समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी श्रीशांतवरील आजीवन बंदी उठविताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याचा सहभाग असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे स्पष्ट केले. न्या. ए मोहम्मद मुश्ताक यांनी बीसीसीआयकडून श्रीशांतविरुद्ध करण्यात आलेली सर्वच कारवाई रद्दबातल केली.
निकालानंतर आनंदी झालेल्या श्रीशांतने क्रिकेटमधील ‘दुस-या इनिंग’ला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी केरळ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. श्रीशांत पुन्हा केरळ संघात दिसावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही केसीएने आधीच दिले आहेत. दरम्यान स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छिणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्याबाबत निर्देश देण्यासाठी केरळ क्रिकेट संघटनेने (केसीए) बीसीसीआयला पत्र लिहिले होते. २०१३च्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे ही बंदी उठविली असल्याने केसीएने हे पाऊल उचलले. ‘मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज असल्याचे श्रीशांतने केरळ संघटनेला कळविले आहे.