कोची - भारतीय संघातील माजी खेळाडू एस. श्रीशांतने नुकतेच क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रीशांतचं पुनरागमन तितकंसं चांगलं ठरलं नाही. श्रीशांतला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात जावे लागले. आता रुग्णालयातील त्याचे फोटो समोर आले आहेत. तसेच श्रीशांतला झालेल्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
एस. श्रीशांतच्या सहकाऱ्याने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात श्रीशांत बेडवर झोपलेल्या स्थितीत दिसत आहे. तर श्रीशांतचा मित्र या दुखापतीमधून लवकर बरा व्हा यासाठी प्रार्थना करत आहे. हाच फोटो श्रीशांतने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
दरम्यान, श्रीशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याला झालेल्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. मला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली होती. तसेच मला चालताही येत नव्हते, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर एस. श्रीशांतला दुखापतीमुळे केरळच्या पुढील सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. ३९ वर्षीय श्रीशांतने केरळच्या संघाकडून पुनरागमन केले होते. मात्र आता दुखापतीमुळे श्रीशांतला सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे.
श्रीशांतने हल्लीच झालेल्या आयपीएलच्या लिलावात सहभाग घेतला होता. त्याने ५० लाख रुपयांची बेस प्राईस ठेवली होती. मात्र तरीही लिलावात कुठल्याही खेळाडूने त्याला विकत घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. एस. श्रीशांतने मेघालयविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात २ बळी टिपले. तर फलंदाजी करताना १९ धावा काढल्या होत्या. श्रीशांतने भारताकडून शेवटचा सामना २०११ मध्ये खेळला होता.