Mohammad Nabi creates History, SA vs AFG Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीतील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीने इतिहास रचला. ४० वर्षीय नबीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत एक खास विक्रम आपल्या नावे केला. दक्षिण आफ्रिकेने ५ षटकांत २८ धावा केल्या होत्या. नबीने सहावा षटक टाकला, जो त्याचा पहिलाच षटक होता. पहिल्याच चेंडूवर नबीने झोर्झीला मिड-ऑनच्या दिशेला झेलबाद करवले. झोर्झीचा डाव ११ चेंडूत ११ धावांवर संपला. या विकेटसह नबीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात कुणालाही न जमलेला पराक्रम केला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेट घेणाऱ्या वयस्क खेळाडूंच्या यादीत नबी हा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. नबीने आज ४० वर्षे ५१ दिवस या वयात चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिली विकेट घेतली. या यादीत सर्वात वयस्क खेळाडू अमेरिकेचा टोनी रीड आहे. त्याने २००४ मध्ये ४२ वर्षे आणि १५४ दिवसांच्या वयात न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्या (वय ४० वर्षे ८९ दिवस) आहे. त्यानंतर नबीचा नंबर लागतो. पण महत्त्वाची बाब म्हणजे, वयाशी चाळीशी ओलांडल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केवळ नबीनेच करून दाखवला आहे.
अफगाणिस्तानचा पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीत समावेश
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९९८ मध्ये झाली. २०१७ पर्यंत आठ वेळा ही स्पर्धा खेळवली गेली. त्यात अफगाणिस्तानला पात्र ठरता आले नाही. यावेळेस मात्र अफगाणिसतानच्या संघाने स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. अफगाणिस्तानने आपला पहिला सामना आज आफ्रिकेविरूद्ध खेळायला सुरुवात केली. प्रथम गोलंदाजी करताना अफगाणिस्ताचा संघ आफ्रिकेला तीनशेपार मजल मारण्यापासून रोखू शकला नाही. आफ्रिकेने ५० षटकात ३१५ धावांपर्यंत मजल मारली. रायल रिकल्टनने दमदार शतक ठोकले. तर टेंबा बवुमा, रासी वॅन डर डुसेन आणि एडन मार्करम या तिघांनी अर्धशतकी खेळी केल्या.