Rahmat Shah Catch Video: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले गेले आहेत, परंतु स्पर्धेच्या सुरुवातीलाच काही आश्चर्यकारक झेल चर्चेत आले आहेत. एकीकडे, फलंदाज दमदार शतके ठोकताना दिसत आहेक तर दुसरीकडे काही फिल्डर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने आश्चर्यचकित करणारा झेल टिपला होता. त्यानंतर आज अफगाणिस्तानचा रहमत शाह यानेही अफलातून झेल टिपत वाहवा मिळवली.
दक्षिण आफ्रिकेचा संघ दमदार फलंदाजी करत होता. डेव्हिड मिलर शेवटच्या षटकांमध्ये क्रीजवर होता आणि डेथ ओव्हर्समध्ये मिलर त्याच्या बॅटने तुफान फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात होता. पण रहमत शाहने त्याचे मनसुबे हाणून पाडले. ४८ व्या षटकात डेव्हिड मिलर मोठा फटका खेळायला गेला. फजलहक फारुकीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने पॉइंट-कव्हर्सच्या वरून फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषा ओलांडणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी रहमत शाह डीप कव्हरवरून धावत आला आणि हवेत उडी मारून अप्रतिम झेल टिपला. हा झेल पाहून फलंदाज मिलर याच्यासह सारेच अवाक् झाले. महत्त्वाचे म्हणजे एका हाताने त्याने हा झेल टिपला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. त्यांनी ५० षटकांत ६ गडी गमावून ३१५ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. यामध्ये सलामीवीर रिकल्टनने मोठी भूमिका बजावली. त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे पहिले शतक झळकावले. त्याने सर्वाधिक १०३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (५८), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (५२) आणि एडन मार्करम (नाबाद ५२) यांनीही अर्धशतके झळकावून संघाला त्रिशतकी मजल मारून दिली.
Web Title: SA vs AFG Video Rahmat Shah takes diving catch david miller south africa vs afghanistan champions trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.