दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना रोमहर्षक ठरला. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीनं टाकलेलं अखेरचं षटक इंग्लंड संघाला धक्का देणारे ठरले. विजयासाठी अखेरच्या सहा षटकांत सात धावांचं माफक आव्हानही इंग्लंडला पेलवलं नाही. एनगिडीनं त्या षटकात 3 विकेट्स घेतल्या आणि केवळ पाच धावा देत दक्षिण आफ्रिकेला एका धावेनं थरारक विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या 8 बाद 177 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 176 धावाच करता आल्या. या विजयासह आफ्रिकेनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं 8 बाद 177 धावा केल्या. टेम्बा बवुमा आणि कर्णधार क्विंटन डी कॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. डी कॉक 31 धावा करून माघारी परतला. त्यानंतर व्हॅन डेर ड्युसेननं दुसऱ्या विकेटसाठी बवुमासह अर्धशतकी भागीदारी केली. पहिल्या 11 षटकांत आफ्रिकेनं 111 धावा केल्या होत्या, परंतु त्यांना अखेरच्या 9 षटकांत केवळ 66 धावा करता आल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या धावांवर चाप बसवला. ड्युसेननं 31, तर बवुमानं 43 धावा केल्या. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉयनं 70 धावांची तुफानी खेळी केली. त्यानं 38 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून या धावा कुटल्या. त्याला कर्णधान इयॉन मॉर्गनच्या अर्धशतकी खेळीची साथ लाभली. मॉर्गननं 34 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. त्यामुळेच इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. अखेरच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना टॉम कुरणनं पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या. पण, त्यानंतर एनगिडीनं दुसऱ्या चेंडूवर त्याला बाद केलं. तिसरा चेंडू निर्धाव पडला आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा दोन धावा आल्या.त्यामुळे अखेरच्या दोन चेंडूंत तीन धावांची गरज होती. पण, एनगिडीनं त्या दोन चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. मोईन अलीचा त्रिफळा उडवल्यानंतर अखेरच्या चेंडूवर आदील रशीद धावबाद झाला.
पाहा व्हिडीओ..