SA vs IND 2nd T20I , South Africa won by 3 wkts अल्प धावसंख्येचा बचाव करताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अडचणीत आणले होते. पण शेवटी दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकत टीम इंडियाचा विजयी रथ रोखला. वरुण चक्रवर्तीनं दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
पण ट्रिस्टन स्टब्सची संयमी खेळी आणि अखेरच्या षटकात गेराल्ड कोएत्झी याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १२५ धावांचं टार्गेट ६ चेंडू आणि ३ विकेट्स राखून पार केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं गकेबरहाचं मैदान मारत टीम इंडिया विरुद्धच्या ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसरीकडे सलग ११ टी-२० सामन्यानंतर भारतीय संघाला १२ व्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
वरुन चक्रवर्तीचा जलवा; पाच विकेट्स घेत सामना रंगतदार स्थितीत आणला
गकेबरहाच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघ निर्धारित २० षटकात ६ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यजमान दक्षिण आफ्रिका या अल्प धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज करेल, असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी कमी धावांचा बचाव करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अडचणीत आणले होते. यात वरुण चक्रवर्ती सर्वात आघाडीवर होता. त्याने ४ षटकात १७ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
स्टब्सला मिळाली कोएत्झीची साथ अन् दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ८६ धावांवर आपली ७ वी विकेट गमावली होती. ट्रिस्टन स्टब्सनं संयमी बॅटिंग करत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. दुसऱ्या बाजूला गेराल्ड कोएत्झी यानं १८ व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर आक्रमक बॅटिंग करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं फिरवला. स्टब्सनं खणखणीत चौकार मारून संघाच्या विजय निश्चित केला.