sa vs ind t20 series : ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा भारतीय संघातून वगळल्याने क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली. या प्रश्नावर व्यक्त होताना भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सावध प्रतिक्रिया दिली. आजपासून दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. मराठमोळ्या खेळाडूला शेवटच्या वेळी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला स्थान मिळाले नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय कर्णधाराने सलामीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींवर प्रकाश टाकला. ऋतुराज गायकवाड हा एक उत्तम खेळाडू आहे. आतापर्यंत जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की, संघ व्यवस्थापनाची एक पद्धत आहे, ज्याचा आपल्याला स्वीकार करायला हवा. तो नेहमीच चांगला खेळत आला आहे आणि त्याचीही वेळ लवकरच येईल, असे सूर्यकुमारने सांगितले.
दरम्यान, मराठमोळ्या ऋतुराजने आतापर्यंत भारतासाठी २३ ट्वेंटी-२० सामने खेळले असून, ६३३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर, ऋतुराजने १४० ट्वेंटी-२० सामन्यांत ४,७५१ धावा कुटल्या आहेत. तसेच त्याने एक शतकही झळकावले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल.