दक्षिण आफ्रिकेच्या संघानं युएईतील अबू-धाबीच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात धमाकेदार विजय नोंदवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत आयर्लंडच्या संघाने मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले होते. पण आता वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आयर्लंडला चारीुंड्या चित करत या मालिकेत चमत्काराला संधी देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ठेवलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ निर्धारित ५० षटकेही खेळू शकला नाही. ३१.५ षटकात त्यांचा डाव १३२ धावांत आटोपला.
या दोघांची खेळी ठरली लक्षवेधी, कारण
आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १३९ धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या या दिमाखदार विजयात दोन खेळाडू अधिक लक्षवेधी ठरले. त्यामागचं कारणही एकदम खास आहे. कारण या दोन्ही खेळाडूंनी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र आतापर्यंत त्यांना वनडेत सर्वोत्तम खेळ दाखवता आला नव्हता. पहिल्यांदाच त्यांनी अर्धशतकी खेळी केली. ते दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत रायन रिकलटन (Ryan Rickelton) आणि ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs). या जोडीनं आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात १५२ धावांची भागीदारी केली.
रायन आणि स्टब्सचा धमाका
पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद २७१ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. संघाने ३९ धावांत आघाडीचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. संघ अडचणीत असताना रायन रिकलटन आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीनं डाव सावरणारी खेळी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी रचत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले.
दोघांच्यात कमालीचा योगायोग आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात रायन आणि स्टब्स या दोघांनी वनडे कारकिर्दीतील आपलं पहिले अर्धशतक झळकावले आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये कमालीचे साम्य आहे. दोघांनी २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एवढेच नाही तर दोघेही विकेट किपर बॅटर आहेत. आयर्लंड विरुद्ध रायन रिकलटन हा विकेटमागे दिसला तर स्टब्स हा बॅटरच्या रुपात खेळला. आतापर्यंत वनडे सामन्यात त्यांना चमक दाखवता आली नव्हती. अखेर ते आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत.