Join us

रचिन रविंद्रचा मोठा पराक्रम; सेंच्युरीसह धवन-गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी

यंदाच्या हंगामात दुसरे शतक झळकावत मारली दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:24 IST

Open in App

न्यूझीलंडच्या ताफ्यातून खेळणारा भारतीय वंशाचा स्टार बॅटर रचिन रविंद्र याने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतकी खेळी केलीये. वनडे कारकिर्दीतील त्याचे हे पाचवे शतक ठरले. ही सर्वच्या सर्व शतके त्याने आयसीसीच्या स्पर्धेतच झळकावली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून पहिले शतक पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता सेमी फायनलमध्ये त्याने यंदाच्या हंगामातील दुसरे शतक झळकावले आहे. यंदाच्या हंगामात दोन शतक झळकवणारा तो एकमेव फलंदाज ठरलाय. याशिवाय त्याने सौरव गांगुली आणि शिखर धवनच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारलीये.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एका हंगामातील दुसऱ्या शतकासह रचिनची खास क्लबमध्ये एन्ट्री

२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर एका हंगामात दोन शतके झळकवणारा रचिन रविंद्र हा पहिला खेळाडू आहे. याआधी शिखर धवन याने एका हंगामात दोन शतके झळकवण्याचा पराक्रम केला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एका हंगामात दोन शतके झळकवणारा रचिन हा सातवा फलंदाज आहे. या शतकासह त्याने धवनसह  भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या खास पंक्तीत स्थान मिळवले आहे.  

गेलच्या नावे आहे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका हंगामात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड

रचिन रविंद्र हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकापेक्षा अधिक शतक झळकवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे. याआधी त्याने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतके करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. वयाच्या २५ व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही त्याने मागे टाकला होता. आता त्याने एका हंगामात दोन शतकाचा पराक्रम करून  दाखवलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका हंगामात सर्वाधिक शतकाचा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने एका हंगामात ३ शतके झळकवाली आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक शतके झळकवणारे फलंदाज

  • ख्रिस गेल ३ (२००६)
  • सौरव गांगुली २ (२०००)
  • सईद अन्वर २ (२०००)
  • हर्शल गिब्स २ (२००२)
  • उपुल थरंगा २ (२००६)
  • शेन वॉटसन २ (२००९)
  • शिखर धवन २ (२०१३)
  • रचिन रविंद्र २ (२०२५)

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५न्यूझीलंडद. आफ्रिका