SA vs PAK, 3rd T20I : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं आजच आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकले. पण, त्याचा हा आनंद फार काळ टीकला नाही. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना धु धु धुतलं... मागील ७ वर्षांत पाकिस्तानची अशी अवस्था कोणत्याच संघानं केली नव्हती आणि ती आज आफ्रिकेनं करून दाखवली. प्रथम फलंदाजी करताना जॅनेमन मलान, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व जॉर्ज लिंडे यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर हात साफ केले. ७ वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०त २००+ धावा करणारा आफ्रिका हा पहिलाच संघ ठरला. आफ्रिकेनं २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या. याआधी २०१३मध्ये डिसेंबरमध्ये श्रीलंकेनं २००+ धावा केल्या होत्या.
प्रथम फलंदाजीला आलेल्या मलान व मार्कराम यांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. मलान ४० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर, तर मार्कराम ३१ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांवर माघारी परतला. ही दोघं माघारी परतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजा कमबॅक करतील असे वाटत होते, परंतु लिंडे व ड्यूसेन यांनी हात साफ केले. लिंडेनं ११ चेंडूंत २२, तर ड्युसेननं २० चेंडूंत ३४ धावा कुटल्या.