पाकिस्तानचा युवा फलंदाज सॅम अयूब (Saim Ayub) हा अल्पावधीत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात त्याच्या भात्यातून आणखी एक शतक पाहायला मिळाले. जोहान्सबर्गच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने ९४ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याच्या भात्यातून १३ खणखणीत चौकार अन् २ षटकार पाहायला मिळाले. वनडे कारकिर्दीतील त्याचे हे तिसरे शतक असून या खेळीसह त्याने विराट डाव साधला आहे. २२ वर्षीय खेळाडूनं पहिली तिन्ही शतकं ही परदेशातील मैदानात झळकावली आहेत. या कामगिरीच्या जोरावरच त्याने किंग कोहलीच्या खास पंक्तीत स्थान मिळवले आहे.
सॅम अयूबनं शतकी खेळीसह केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
सॅम अयूब याने एका वर्षात परदेशात सर्वाधिक वनडे शतके झळकवणाऱ्या आशियाई फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. कोहलीनं २०१८ आणि २०१९ मध्ये परदेशात तीन वनडे शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकर (२००१), राहुल द्रविड (१९९९), मोहम्मद हफीज (२०११) आणि सलीम इलाही (२००२) या आशियाई खेळाडूंचाही परदेशात एका वर्षात तीन शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे.
परदेशात सर्वाधिक शतके झळकवणारा आशियाई फलंदाज कोण?
एका वर्षात परदेशात सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे आहे. २०१९ मध्ये हिटमॅन रोहितच्या बॅटमधून ६ वनडे शतके पाहायला मिळाली होती. त्याच्या पाठोपाठ या यादीत सनथ जयसूर्याचा नंबर लागतो. २००६ मध्ये श्रीलंकन स्फोटक फलंदजाने पाच शतके झळकावली होती. त्याच्याशिवाय कुमार संगकाराच्या नावेही ५ वनडे शतके झळकवण्याचा रेकॉर्ड आहे. संगकारानं २०१५ मध्ये हा डाव साधला होता.
बाबर आझमनं फिफ्टी मारली, पण...
पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ७१ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. वनडे कारकिर्दीतील ३४ वे अर्धशतक त्याने पूर्ण केले. पण एक मोठा विक्रम करण्याची संधी त्याने गमावली. वनडेत सर्वात जलद ६ हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी त्याला फक्त ४३ धावांची गरज आहे. आतापर्यंत त्याने १२० डावात ५९५७ धावा केल्या आहेत.