SA vs ZIM T20 World Cup, Video: क्रिकेट हा खेळ जितका साधा वाटतो तितकेच त्याचे नियम गुंतागुंतीचे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या नियमांनी नटलेला हा खेळ कधी कधी केवळ चाहत्यांनाच नाही, तर खेळाडूंनाही आश्चर्यचकित करतो. असाच काहीसा प्रकार २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पाहायला मिळत आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या षटकात फ्री-हिटवर 'बाय' च्या नियमावरून झालेला गोंधळ साऱ्यांनीच पाहिला. त्यानंतर आज दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे सामन्यात अशाच नियमामुळे सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेला नकळत त्या नियमाचा फटका बसला.
सामन्यात नक्की काय घडलं?
सोमवारी होबार्टमध्ये सुपर-१२ फेरीच्या सामन्यात हे दोन संघ भिडले. मात्र, पावसामुळे सामना २० षटकांवरून ९ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ९ षटकांत ७९ धावा केल्या. मात्र, यात झिम्बाब्वेला फुकटात ५ धावा मिळाल्या आणि त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकची नकळत झालेली चूक कारणीभूत ठरली.
शेवटच्या षटकात मिल्टन शुम्बाने एनरिक नॉर्खियाच्या तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप खेळला आणि चेंडू बॅटला लागून फाइन लेगला गेला. तिथे फिल्डरने चेंडू अडवून क्विंटन डी कॉककडे फेकला. तो चेंडू डी कॉकच्या पायाने अडला, पण तिथेच त्याच्या संघाचे नुकसान झाले. चेंडू थांबवण्यापूर्वी, डी कॉकने एक ग्लोव्ह्ज काढला होता. चेंडू पायावर आदळला आणि त्या मैदानावर पडलेल्या ग्लोव्ह्जवर जाऊन लागला.
काय आहे क्रिकेटचा नियम?
नियमानुसार, अंपायरने पेनल्टी रनचे संकेत देताच नॉर्खियाला धक्का बसला. नंतर त्याला कारण समजावून सांगण्यात आले. हा नियम असा की- खेळाडूच्या अंगावरील एखादी गोष्ट म्हणजे हेल्मेट, ग्लोव्ह्ज, रूमाल अशा कोणत्याही गोष्टी जमिनीवर पडलेल्या असतील आणि त्याला चेंडू लागला, तर नियमानुसार प्रतिस्पर्धी संघाला ५ गुण मोफत दिले जातात.