Rahul Dravid, Team India: भारतीय क्रिकेट संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. त्यात आशिया चषकात भारतीय संघाकडून वाईट कामगिरी झाली आहे. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकलेला नाही आणि सुपर-४ च्या लढतीतूनच संघाचं आव्हान संपुष्टात आलं. राहुल द्रविड यांनी गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली आहे. त्यानंतर आशिया चषकाच्या माध्यमातून त्यांच्या प्रशिक्षणाखाली ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. आतापर्यंत द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ फक्त मालिकाच खेळला आहे. यातही भारतीय संघाची कामगिरी काही विशेष पाहायला मिळालेली नाही. यावरुनच भारतीय संघाचे माजी निवडसमिती प्रमुख आणि क्रिकेटपटू सबा करीम यांनी द्रविडबाबत महत्वाचं विधान केलं आहे.
राहुल द्रविडसाठी सध्याच्या काळ खूप कठीण असल्याचं ते म्हणाले. आपला हनीमून पीरियड आता संपला आहे याची जाणीव द्रविडलाही असेल आणि आता त्याच्याकडून परफेक्ट टीम कशी बनवता येईल याचे प्रयत्न सुरू असतील. पण अद्याप ठोसपणे असं काही झालेलं दिसून येत नाही. राहुलकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्याच्यासाठी सध्याचा काळ खूप कठीण आहे, असं सबा करीम म्हणाले.
असं मिळेल राहुलला यश"राहुल अत्यंत समजूतदार आणि बुद्धीमान व्यक्ती आहे. आपल्या प्रशिक्षणाखालील संघानं आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या आणि दुसऱ्या बाजूला द.आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकली तरच संघाला नंबर वन बनवता येईल याची कल्पना त्याला आहे", असं सबा करीम म्हणाले.
"मी फक्त कसोटीच नव्हे, तर इतरही मालिकांबाबत हेच बोलत आहे. राहुल जेव्हा एक खेळाडू म्हणून मैदानात होता. तेव्हा या देशांमध्ये जाऊन मालिका जिंकल्यानंतर तोही संघाच्या कामगिरीवर किती खूश व्हायचा याची कल्पना त्याला आहे. त्यामुळे संघाला नंबर वनवर कसं आणायचं हे द्रविडला चांगलं माहित आहे", असंही ते म्हणाले.
वर्ल्डकपआधी भारताच्या दोन मालिकाऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. २० सप्टेंबरपासून दोन्ही देशांमध्ये तीन टी-२० सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. अवघ्या तीन दिवसांच्या अंतरानंतर भारतीय संघाला द.आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.
पुढे ५ दिवसांचा ब्रेक संघाला मिळणार आहे. यात काळात भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात दाखल व्हायचं आहे. त्यानंतर भारतीय संघ १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. तर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.