वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करतोय बीडचा ‘सचिन’

१९ वर्षांखालील क्रिकेट : मराठमोळा खेळाडू ठरला भारताच्या विजयाचा हीरो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 05:35 AM2024-02-08T05:35:06+5:302024-02-08T05:36:19+5:30

whatsapp join usJoin us
'Sachin Dhas' of Beed is fulfilling his father's dream of cricket team india | वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करतोय बीडचा ‘सचिन’

वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करतोय बीडचा ‘सचिन’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : बीडच्या मातीतला मराठमोळा खेळाडू सचिन धस हा भारतीय संघाच्या विजयाचा ‘हीरो’ ठरला. आयसीसी १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात मंगळवारी  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन गड्यांनी विजय मिळवून देण्यात सचिनचा (९६) मोलाचा वाटा राहिला. कर्णधार उदय सहारनच्या (८१) सोबतीने त्याने १७१ धावांची भागीदारी करीत भारताला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. सचिनची आई सुरेखा धस या महाराष्ट्र पोलिसमध्ये सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या माजी कबड्डीपटूही आहेत.   सचिनची बहीण पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. आपला मुलगा आपले स्वप्न साकारणार या आशेनेच वडील संजय यांनी त्याच्या हातात बॅट दिली. सचिननेही वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. सचिनने क्रिकेटपटू व्हावे, अशी आईची इच्छा नव्हती; पण मुलगा या खेळासाठीच बनला आहे, हा ठाम विश्वास संजय यांना होता. 

चार वर्षांचा असल्यापासून सचिनच्या खेळाला आकार देण्याचे श्रेय प्रशिक्षक शेख अझहर यांना जाते. ते म्हणाले, ‘मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने खेळपट्ट्यांवर टाकण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे बीडमध्ये केवळ अर्ध्या खेळपट्ट्या तयार केल्या जातात. सचिन चार वर्षांचा असताना वडिलांसोबत आला तेव्हापासून अर्ध्या खेळपट्टीवरच त्याने सराव केला.’ सचिन तेंडुलकरपासून प्रेरणा घेत याचे नावही सचिन ठेवण्यात आले; पण हा सचिन विराट कोहलीचा फॅन आहे. बीडचा हा स्टार फलंदाजही मास्टर ब्लास्टर सचिनप्रमाणेच १० क्रमांकाचे टी शर्ट परिधान करतो. संजय म्हणाले, ‘२००५ ला सचिनचा जन्म झाला तेव्हा तेंडुलकरच्या नावापासून प्रेरणा घेत त्याचे नाव ठेवले. मी सचिन तेंडुलकरचा, तर माझा सचिन हा कोहलीचा चाहता आहे. त्याचा कुणीही मित्र नाही. सचिन कुठल्याही लग्नात किंवा वाढदिवसाला जात नाही. त्याचे लक्ष केवळ क्रिकेटकडे आहे. आई पोलिस असल्याने तो शिस्तप्रिय आहे. पोलिस अधिकारी म्हणून आईच्या कामाचा व्याप आणि तास ठरलेले नाहीत. सचिनने क्रिकेटपटू व्हावे, हे आईला मान्य नव्हतेच.’ यावरून पतीसोबत त्यांचे मतभेद व्हायचे, तरी वडिलांनी सचिनला क्रिकेटमध्ये  टाकले. नंतर आईचेही मन वळविले. आता आई सुरेखा स्वत: 
मोबाइलवर विश्वचषकाचे सामने आवर्जून पाहतात.

  ‘दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज चांगला मारा करीत असताना आम्ही संकटावर मात केली. कर्णधार उदय सहारनच्या सोबतीने मोठी भागीदारी होईल आणि विजय साकार होण्याचा विश्वास होता,’ असे १९ वर्षांखालीसी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात भारताला सलग पाचव्यांदा अंतिम फेरी गाठून देणारा आक्रमक फलंदाज सचिन धस याने सांगितले. 

अझहर यांच्याविना हा प्रवास अशक्यच!

सचिनचा अभ्यास आणि सराव कसा चालतो, असे विचारताच संजय म्हणाले, ‘सचिन सकाळी चार तास आणि सायंकाळी तीन तास सराव करतो. यादरम्यान जिममध्येही वेळ देतो. प्रशिक्षक अझहर यांच्याविना सचिनचा हा प्रवास शक्य नव्हता,’ या शब्दात संजय यांनी कोचबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज

उदय सहारन (भारत)    ६ सामने    ३८९ धावा
मुशिर खान (भारत)    ६ सामने    ३३८ धावा
सचिन धस (भारत)    ६ सामने     २९४ धावा
हुआन प्रिटोरियस (द. आफ्रिका)    ६ सामने    २८७ धावा

Web Title: 'Sachin Dhas' of Beed is fulfilling his father's dream of cricket team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.