उस्मानाबाद : क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरने पिचवरील आपल्या झंझावाती शैलीचा प्रत्यय मंगळवारी डोंजा (जि़.उस्मानाबाद) येथे दिला़ अवघ्या दोनच तासात सचिनने आपल्या दत्तक ग्राम डोंजातील ४ कोटींच्या कामांची पाहणी करीत विद्यार्थी, ग्रामस्थांशी संवाद साधला़ शिवाय, विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंदही लुटला़
सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावातील विकासकामांची पाहणी सचिनने मंगळवारी दुपारी केली़ ग्रामस्थांनी त्याचे स्वागत घरासमोर गुढी उभारुन केले़ पहिल्यांदा त्याने ८६ लाख ३९ हजार रुपये खर्चून होत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम पाहिले़ यानंतर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळून त्यांच्याशी संवादही साधला़ शाळेत धमाल मस्ती करतानाच अभ्यास करण्याचा व गुरुजी, आई-वडीलांचा आदर करण्याचा सल्ला त्याने दिला़ त्यानंतर ९९ लाख १६ हजार रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना व २ कोटी २१ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या अंतर्गत रस्ते कामाची पाहणी करुन सचिनने ग्रामस्थांशी संवाद साधला़ यावेळी तो म्हणाला, स्वच्छ भारत हे अभियान आपल्या घरापासून सुरु होते़ त्यामुळे जशी आपण आपल्या घराची काळजी घेतो, तशीच ती आपल्या ‘धरती माँ’ची घेणेही आपली जबाबदारी आहे़ ही जबाबदारी नेटाने पार पाडून स्वच्छता राखूया़ जितके प्रेम संपूर्ण भारताने माझ्यावर केले़ तितकेच डोंजावासियांनी केले़ हा अनुभव, या आठवणी सदैैव माझ्यासोबत राहतील, असे उद्गार सचिनने यावेळी काढले़ यावेळी त्याने गावातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा तसेच गुणवंतांचा सत्कार केला़
शाळा मला आवडते़
विद्यार्थ्यांना संबोधताना सचिन म्हणाला, शाळा मला खूप आवडते़ कारण, शाळेत खूप मस्ती करता येते़ विद्यार्थ्यांनो तुम्हीही मस्त मस्ती करा़ खेळा, अभ्यास करा़ यासोबतच तुमचे गुरुजी, आई-वडील यांचा आदर करा़ त्यांचे सांगणे ऐका़ तसेच प्रत्येकाने स्वप्ने बाळगावी़ त्याचा पाठलाग करावा़ यश नक्की मिळेल़ तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल, याची मला खात्री आहे़
ग्राऊंड बनले स्टेडियम़़-
क्रिकेटच्या मैदानावर जाऊन सचिनने विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला़ मात्र, सचिनच्या चाहत्यांनी मैदान गच्च भरले होते़ अगदी पिचभोवतीही चाहत्यांचा गराडा पडल्याने सचिनला मनसोक्त टोलेबाजी करता आली नाही़ त्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या गोलंदाजीवर ‘डिफेन्स’चे कौशल्य सादर केले़