अयाझ मेमन
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा पृथ्वी शॉने जबरदस्त शतक झळकावून आपल्यातली क्षमता सर्वांना दाखवून दिली. गेल्या चार - पाच वर्षांपासून त्याच्या गुणवत्तेची मोठी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. तो कधी भारतीय संघात स्थान मिळविणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यात कितपत यशस्वी होईल याचीही उत्सुकता लागली होती. कारण देशांतर्गत स्पर्धांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे ही खूप वेगळी बाब असते. महत्त्वाचे म्हणजे पृथ्वी जेव्हापासून प्रकाशझोतात आला तेव्हापासून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगण्यात आल्या आणि त्यात तो यशस्वीही ठरू लागला हे विशेष. मुंबई क्रिकेट गाजवल्यानंतर त्याची १९ वर्षांखालील संघात निवड झाली, युवा भारतीय संघाला त्याने विश्वचषक जिंकवून दिला, रणजी स्पर्धेत छाप पाडली. यानंतर इंग्लंडमध्ये काही काळ त्याने खेळ केला. तिथेही त्याने छाप पाडली. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघात त्याची निवड झाली; पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली ती राजकोटमध्ये.
पृथ्वीने आपल्या पहिल्याच डावामध्ये आक्रमक पवित्रा घेतला होता आणि हे खूप शानदार होते. त्याच्या खेळामध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचे मिश्रण असल्याचे सातत्याने जाणवते. कारण तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेच, पण त्याचबरोबर तो आक्रमकही आहे. तो चौकार - षटकार मारण्याची एकही संधी सोडत नाही. सचिननेही त्याला नैसर्गिक खेळावर अधिक भर देण्याचा सल्ला दिला होता आणि पृथ्वीचा नैसर्गिक खेळ आक्रमक आहे. त्यामुळेच पृथ्वी रणजी, दुलीप ट्रॉफीनंतर कसोटी पदार्पणातही शतक झळकावताना दिसला. आता पृथ्वीसाठी आकाश ठेंगणं असंच म्हणावं लागेल. असे असले तरी, हा विंडीज संघ खूप कमजोर आहे, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. जेसन होल्डरच्या अनुपस्थितीत विंडीजच्या गोलंदाजीत काहीच दम दिसला नाही. शिवाय भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार असून त्यासाठी पृथ्वीने सज्ज राहायला पाहिजे. आता पदार्पणात शतक झळकावल्यानंतर अनेक प्रतिस्पर्धी संघांचे प्रशिक्षक व कर्णधार त्याच्या खेळीचे व्हिडीओ पाहून त्याला कोंडीत पकडण्यासाठी योजना आखतील. या सर्व आव्हानांचा सामना करणे हे पृथ्वीसाठी सर्वांत आव्हानात्मक असेल. पृथ्वीची तुलना नेहमी सचिन तेंडुलकरशी होते. सचिन २५ वर्षे अव्वल फलंदाज राहिला. अनेक फलंदाज असे झालेत ज्यांनी जबरदस्त सुरुवात केली, पण नंतर त्यांची कारकिर्द ढेपाळली. त्यामुळे पृथ्वीला अधिक सजग राहावे लागेल. आता भविष्यात त्याचा दृष्टिकोन कसा राहतो हे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे.
(लेखक लोकमत समुहात संपादकीय सल्लागार आहेत)