IND vs SA Test Series : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याची सुरूवात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. यातील पहिला सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हायरसचा वाढता धोका पाहता या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु, दोन्ही संघ मात्र कसून तयारी करताना दिसत आहेत. आफ्रिकेच्या खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा वेगळ्या आणि वेगवान असतात. त्यामुळे भारताच्या फलंदाजांसाठी ही एक मोठी कसोटी असणार आहे. पण या दरम्यान भारताचा महान फलंदाजी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतीय फलंदाजांच्या मदतीला आला आहे. दक्षिण आफ्रिकेत जर भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करायची असेल तर नक्की काय करावं, याबद्दल त्याने मत व्यक्त केलं.
दक्षिण आफ्रिकेतील वेगवान खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंनी पाय पुढे काढून म्हणजेच फ्रंट फूटवर येऊन खेळायला हवं असा कानमंत्र त्याने दिला. "मी नेहमी सांगतो की आफ्रिकेत खेळताना फ्रंट फूटवर बचावात्मक खेळ करावा. चेंडू कसाही आला तरी पाय पुढे काढून जर बचावात्मक खेळ केला तर फलंदाजाला विश्वास मिळतो. आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर फ्रंट फूट डिफेन्सला खूप महत्त्व आहे. पहिल्या २५ षटकांचा खेळ हा खूप कठीण असतो, त्यावेळी फ्रंट फूट डिफेन्सचा वापर करणं उपयुक्त ठरेल", असं सचिनने स्पष्टपणे सांगितलं.
पुढे मास्टरब्लास्टर म्हणाला, "इंग्लंडमध्ये जेव्हा भारतीय संघ गेला होता त्यावेळी लोकेश राहुलने असाच खेळ करून धावा केल्या. रोहित शर्मानेदेखील चांगली फलंदाजी केली त्यामागचं खरं कारण फ्रंट फूटवर बचावात्मक खेळ करणं हेच होतं. या दोघांनाही पाय पुढे काढून बचावात्मक फटके खेळता येतात. त्याचा त्यांना फायदा झाला. त्या दोघांनी ज्या प्रकारची खेळी केली त्यात एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे हात शरीरापासून लांब जात नव्हते. जेव्हा तुमचे हात तुमच्या शरीरापासून लांब जाऊ लागतात त्यावेळी तुमचे फटक्यांवरचे नियंत्रण कमी होते", या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सचिनने लक्ष वेधलं.
फ्रंट फूटवर बचावात्मक फटके खेळताना त्यांना काही चेंडू समजले नाहीत ही गोष्ट साऱ्यांनीच पाहिली. पण त्याचा फारसा परिणाम त्यांच्यावर होत नाही. कारण प्रत्येक फलंदाजाला एखादा तरी चेंडू असा येतोच जो त्याला कळत नाही. गोलंदाज नेहमी फलंदाजाची विकेट काढण्यासाठीच गोलंदाजी करत असतो. त्यामुळे असं घडणं स्वाभाविक आहे. अशा वेळी बॅटची कड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅट आणि फटक्यावर पूर्णपणे नियंत्रण असणं आवश्यक आहे", असा सल्ला सचिनने दिला.