मुंबई - एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाला असून पुन्हा एकदा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. स्वत: विनोद कांबलीने हा खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, विनोद कांबळीने ही माहिती दिली आहे. 'आमच्यात सर्व काही ठीक आहे. यासाठी मी आनंदी आहे. आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि बातचीत केली' असं विनोद कांबळीने सांगितलं आहे.
45 वर्षीय विनोद कांबळीने सांगितलं आहे की, 'जे काही झालं होतं, ते सर्व आमच्यात होतं. आमच्या नव्या मैत्रीमुळे मी प्रचंड आनंदी आहे'. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रसी XI : द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यावेळी दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्या.
क्रिकेटच्या विश्वातील उगवते तारे म्हणून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीकडे पाहिलं जात होतं. एकाचवेळी आपल्या करिअरला सुरुवात करणा-या दोघांचा शेवट मात्र वेगळा झाला. सचिन तेंडुलकर एक महान खेळाडू म्हणून उदयाला आला, तर विनोद कांबळीचं करिअर मात्र अयशस्वी ठरलं. दोघांच्या मैत्रीत फूट पडण्यास कारणीभूत ठरला तो एक टीव्ही शो. 2009 रोजी एका टीव्ही शोमध्ये विनोद कांबळीने केलेल्या वक्तव्यामुळे दोघांच्या मैत्रीत फूट पडली.
या शोमध्ये विनोद कांबळीने सचिनने आपल्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास मदत केली नाही असं म्हणत खळबळ माजवली होती. विनोद कांबळीचं हे वक्तव्य सचिनला आवडलं नाही, आणि दोघांमध्ये अंतर आलं. 2013 रोजी जेव्हा सचिनने 200 वा कसोटी सामना खेळल्यानंतर आपली निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी वानखेडे स्टेडिअममध्ये दिलेल्या भाषणात सचिनने आपल्या करिअरमध्ये वाटा असणा-या सर्वांचं नाव घेतलं पण विनोद कांबळीचा उल्लेख केला नाही.
सचिन आणि विनोद कांबळी एकत्र शिकले. इतकंच नाही तर रमाकांत आचरेकर हेच दोघांचे कोच होते. त्यांनीच दोघांनी क्रिकेटचे धडे दिले. मुंबई आणि टीम इंडियासाठी दोघेही एकत्र खेळले. शालेय क्रिकेटदरम्यान दोघांनी नॉट आऊट 664 धावांची भागीदारी करण्याचा रेकॉर्ड केला होता.