icc odi world cup 2023 | मुंबई : वन डे विश्वचषकात श्रीलंकेला पराभूत करून भारतीय संघाने उपांत्य फेरीत अधिकृतरित्या प्रवेश केला. सलग सातव्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने १४ गुणांसह गुणतालिकेत आपले वर्चस्व निर्माण केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा डोंगर उभारण्यात यजमानांना यश आले. शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी अप्रतिम खेळी करून भारताची धावसंख्या ३५० पार पोहचवली. भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३५७ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पूर्णपणे चीतपट झाला.
३५८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १९.४ षटकांत ५५ धावांवर सर्वबाद झाला. टीम इंडियाने अष्टपैलू खेळी करून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजी मग क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या माध्यमातून रोहितसेनेने चाहत्यांची मनं जिंकली. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक (९२) धावांची खेळी केली, तर विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) यांनी चांगली खेळी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने २४ चेंडूत ३५ धावा करून भारताची धावसंख्या ३५० पार पोहचवली.
दरम्यान, नेहमीप्रमाणे अप्रतिम क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय क्षेत्ररक्षकाला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या पदकाचा मानकरी श्रेयस अय्यर ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अय्यरच्या नावावर शिक्कामोर्तब केला अन् भारतीय शिलेदारांनी ड्रेसिंगरूममध्ये एकच जल्लोष केला. लोकेश राहुलच्या हस्ते अय्यरला सुवर्ण देऊन गौरविण्यात आले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. खरं तर दोनवेळा या पदकाचा मानकरी होणारा लोकेश राहुलनंतर श्रेयस अय्यर दुसरा खेळाडू ठरला आहे.
भारताचा विजयरथ कायमश्रीलंकेला ३०२ धावांनी पराभूत करून भारताने चालू विश्वचषकात सलग सातवा विजय मिळवला. चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवून विजयी सलामी दिल्यानंतर विजयाचा षटकारही मारण्यात टीम इंडियाला यश आले. भारत आपल्या आगामी सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडेल, तर साखळी फेरीतील अखेरचा सामना नेदरलॅंड्सशी होईल.