मोहाली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली नेहमी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला स्वत:चा हिरो मानतो. आता विराट १०० वी कसोटी खेळणार आहे, तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विराटचे कौतुक केले आहे. सचिनने विराटची मैदानावरील कामगिरी शानदार असल्याचे सांगून, क्रिकेटपटूंच्या एका पिढीला प्रेरणा देण्याचे त्याने केलेले काम हेच विराटचे खरे यश असल्याचे म्हटले आहे.
विराट १०० वी कसोटी खेळण्यासाठी आज मैदानावर उतरेल. यानिमित्ताने बीसीसीआयने विराटबद्दल काही माजी खेळाडूंचे मत जाणून घेतले. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सचिन म्हणाला,‘हा टप्पा किती शानदार आहे. मला आठवते की, जेव्हा मी तुझ्याबद्दल सर्वात प्रथम ऐकले होते, तेव्हा २००७-०८ साली आम्ही ऑस्ट्रेलियात होतो. तुम्ही मलेशियात १९ वर्षांखालील विश्वचषक खेळत होता. संघातील काही खेळाडू असे होते, त्याबद्दल आम्ही चर्चा करीत होतो. तेव्हा तुझे नाव समोर आले. या खेळाडूच्या कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजे, तो चांगली फलंदाजी करतो,’असे मी म्हटले होते.
त्यानंतर आपण दोघे भारतीय संघासाठी एकत्र खेळलो. हा कालावधी फार मोठा नसला तरी जो वेळ आपण एकत्र घालवला, त्यावरून तुझ्यातील एक गुण लक्षात आला तो म्हणजे तू नव्या गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक होतास. तू खेळावर काम सुरू ठेवले आणि सर्वोत्तम होत गेलास.’ सचिनने विराटच्या फिटनेसचे कौतुक केले.