Join us  

रहाणेच्या पाठिशी सचिन खंबीर; विराटच्या अनुपस्थितीत रहाणेच 'बेस्ट'

अजिंक्य रहाणे अतिशय समजूतदार खेळाडू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघाला चांगलं नेतृत्व देईल

By मोरेश्वर येरम | Published: December 16, 2020 9:41 PM

Open in App
ठळक मुद्देविराटच्या अनुपस्थितीत रहाणेच कसोटी संघाचा बेस्ट कर्णधार, सचिनचं मतरहाणे समजूतदार आणि संयमी फलंदाज असल्याचं सचिन म्हणालानिकालाऐवजी कामगिरीवर लक्ष दिलं तर यश नक्की, सचिनचा सल्ला

नवी दिल्लीऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाला चांगलं नेतृत्त्व देऊ शकतो, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे. 

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. यावेळी सचिनने मुंबईकर रहाणेचं कौतुक केलं. "अजिंक्य भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. रोहित, अजिंक्य, चेतेश्वर हे संघात बऱ्याच वेळापासून आहेत. त्यासोबत युवा खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे संघ समतोल आहे. वैयक्तिक कारणांमुळे विराटला माघारी परतावं लागणार आहे. तर संघाला तयार राहावं लागेल. कारण सामान्यत: एका खेळाडूकडून संपूर्ण मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाते. पण त्याची कोणतीही शाश्वती नसते", असं सचिन म्हणाला. 

अजिंक्य रहाणे अतिशय समजूतदार खेळाडू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघाला चांगलं नेतृत्व देईल, असा विश्वास सचिनने व्यक्त केला. एडलेडमध्ये होणाऱ्या पहिल्या डे-नाइट कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. 

"विराट आणि अजिंक्यची तुलना करणं योग्य नाही. अजिंक्यला मी ओळखतो. तो समजूतदार आणि संयमी आहे. तो आक्रमक आहे पण त्यावर त्याचं नियंत्रण देखील आहे. मी जितका त्याच्यासोबत वेळ घालवलाय त्यानुसार मी नक्कीच सांगू शकतो की तो खूप मेहनती आहे", असा कौतुकाचा वर्षाव सचिनने रहाणेवर केला. 

"रहाणे कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही. जर तुम्ही मेहनती आहात तर तुम्हाला त्याचं फळ मिळतंच. त्यामुळे भारतीय संघाला चांगलं फळ मिळेल याचा मला विश्वास आहे. निकालापेक्षा कामगिरीवर संघाने लक्ष द्यावं", असंही सचिन म्हणाला. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली