- दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि नागपूरचे नरेश वाघमाेडे यांच्या मैत्रीचा उल्लेख हाेताच भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री डाेळ्यासमाेर येते. सचिन केवळ सचिन असताना ३७ वर्षांपूर्वी व्हीसीए मैदानावर ही मैत्री फुलली, बहरली आणि आज सचिन क्रिकेटचा देव झाला तरी ही मैत्री तशीच घट्ट आहे.
१९८७ मध्ये त्यांची भेट जुन्या व्हीसीएच्या मैदानावर झाली. मुंबई ज्युनिअर संघाचा कर्णधार असलेल्या सचिनला नेट प्रॅक्टिसदरम्यान ‘बॉलिंग’ करणे तसेच ‘नॉकिंग’ला मदत करण्याचे काम नरेश करायचा. त्यावेळी सचिनशी त्याची मैत्रीची गाठ घट्ट बांधली गेली. मित्र नरेशला सचिन कधीच विसरला नाही. सचिन नागपूरला आला की, नरेशकडून वांग्याचं भरीत, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, फोडणीचं वरण हॉटेलमध्ये मागवायचा.
मैत्रीच नाही तर कौटुंबिक नातेही
नरेश वाघमोडेची सचिनशी केवळ मैत्रीच नाही तर कौटुंबिक नातेही आहे. तो आजपर्यंत अनेकदा मुंबईला सचिनच्या घरी गेला. सचिनचे जुने निवासस्थान असलेल्या साहित्य सहवासात तो दीड वर्ष राहिला. सचिनचे लग्न, वडिलांचे निधन, सचिन नव्या बंगल्यात जाताना या सर्व क्षणांचा नरेश साक्षीदार आहे. सचिनच्या आईने नरेशच्या पत्नीला साडी-चोळी देऊन तिची ओटी भरली होती. निवृत्तीच्या वेळी मास्टर ब्लास्टर सचिनने ज्या मोजक्या व्यक्तींना विशेष निमंत्रण दिले त्यात नरेशचाही समावेश होता.
Web Title: Sachin Tendulkar became 'God'; But friendship is not forgotten with naresh Waghmode from Nagpur
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.