Join us  

बॅट कारागीर अश्रफ चाचांच्या मदतीला धावला सचिन; उपचारांसाठी आर्थिक मदत करणार

अश्रफ चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू; आर्थिक अडचणीत असलेल्या चौधरींना सचिनकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:14 AM

Open in App

मुंबई: दिग्गज क्रिकेटपटूंच्या बॅट दुरुस्त करणारे अश्रफ चौधरी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना पैशांची आवश्यकता आहे. अश्रफ यांच्या मदतीसाठी अखेर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अश्रफ यांना रुग्णालयात लागणारी आर्थिक मदत सचिनकडून केली जाणार आहे.अश्रफ मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना काही आठवड्यांपासून किडनीची समस्या आहे. अश्रफ यांचे शुभचिंतक असलेले प्रशांत जेठमलानी हे अश्रफ यांच्यावर चांगले उपचार व्हावेत, यासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. पण सध्याच्या घडीला एकही क्रिकेटपटू अश्रफ यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचं दिसत नव्हतं. काही जणांनी अश्रफ यांच्याकडून आपलं काम करून घेतलं, पण त्यांना अजूनही पैसे दिलेले नाहीत. पण आता सचिननं अश्रफ यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.मुंबईतील मेट्रो सिनेमाघराच्या जवळ अश्रफ यांचं एक दुकान आहे. काही दिवसांपूर्वी अश्रफ यांच्या भावाचं निधन झालं आणि आता ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. या कठीण प्रसंगी क्रिकेटपटूंनी अश्रफ यांना मदत करावी, अशी अपेक्षा प्रशांत यांनी बोलून दाखवली. 'काही क्रिकेटपटूंनी अजूनही अश्रफ यांच्या कामाचे पैसेही दिलेले नाहीत. ते पैसे जर मिळाले असते तर ही वेळ आली नसती. पण अश्रफनं अजूनही त्यांच्याकडे पैसे मागितलेले नाहीत. या अवघड काळात क्रिकेटपटूंनी अश्रफ यांची मदत करायला हवी,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली.सचिन तेंडुलकर अश्रफ यांना मदत करणार असल्याची माहिती प्रशांत यांनी दिली. 'अश्रफ यांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर धावला आहे. सचिननं अश्रफ यांच्याबरोबर संवादही साधला आहे. त्याशिवाय सचिन त्यांना आर्थिक मदतही करणार आहे', असं प्रशांत यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोणीही अश्रफ यांच्या मदतीसाठी यायला तयार नव्हतं, त्यावेळी बॉलीवूड अभिनेता सोनू सूदनं अश्रफ यांना मदत करण्याचं ठरवलं होतं. पण सोनूपूर्वीच सचिननं अश्रफ यांना मदत केली आहे. 

टॅग्स :सचिन तेंडुलकर