Sachin Tendulkar on Carlos Alcaraz winner of Wimbledon 2023: विम्बल्डन या मानाच्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी अनुभवी नोव्हाक जोकोविचला नवख्या कार्लोस अलकराझकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचचा १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा पाच सेटमध्ये आणि सुमारे पाच तास चाललेल्या सामन्यात पराभव केला. पहिल्या तीन पैकी दोन सेट गमावल्यानंतर, जोकोविचने कमबॅक करत सामना पाचव्या सेटपर्यंत खेचला. पण अखेर शेवटच्या सेटमध्ये ६-४ अशा गुणसंख्येने अलकराझने पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला. राफेल नदालने २००८ व २०१० मध्ये तर मॅन्यूएल सँटानाने १९६६ मध्ये विम्बल्डन जिंकली होती. त्याच्या विजयानंतर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याने त्याचे अभिनंदन केले आणि कौतुक केले.
४ तास आणि ४३ मिनिटं रंगलेल्या सामन्यात अनुभवी जोकोविचला अलकराझने पराभूत केले. त्यानंतर अलकराझवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यातही, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने त्याचे ट्विट करत कौतुक केले आणि खूप मोठी शाबासकीही दिली. "दोन्ही खेळाडूंनी अतिशय तुफानी खेळ केला. अंतिम सामना पाहायला खरंच खूप मजा आली. आपण आजच्या सामन्यात टेनिसमधील एका नव्या ताऱ्याचा उदय पाहिलाय. ज्याप्रमाणे मी रॉजर फेडररच्या कारकिर्दीतील प्रत्येक सामना न चुकता पाहिलाय, तसंच आत मी पुढली १०-१२ वर्षे अलकराझच्या कारकिर्दीतील सामने नक्की बघेन. कार्लोस अलकराझ, तुला खूप खूप शुभेच्छा!", असे सचिनने ट्विट केले.
सर्बियाच्या जोकोविचने पहिला सेट ६-१ असा सहज जिंकला. त्यानंतर अलकराझने पुढला सेट टायब्रेकरमध्ये तर तिसरा सेट ६-१ असा एकतर्फी जिंकला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन केले आणि ३-६ असा सेट जिंकला. त्यामुळे पाचवा सेट निर्णायक ठरला. पाचव्या सेटमध्ये सुरूवातीला जोकोविच ४-२ असा पिछाडीवर होता. तरीही त्याने सामना ५-४ असा रंगतदार स्थितीत आणला. पण अखेरच्या गेममध्ये अलकराझने विजय नोंदवत शेवटचा सेट ६-४ ने जिंकला व विजेतेपदावर नाव कोरले.