Sachin Tendulkar on IND vs ENG 4th Test: पहिल्या सामन्यात पराभूत होणाऱ्या रोहित शर्माच्या टीम इंडियाने आज पराक्रम करून दाखवला. भारतीय संघाने सलग तीन कसोटी सामने जिंकत पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. आज संपलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला ३०७ धावाच करता आल्या. पण दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ वर गारद झाला. मग भारतीय संघाने १९२ धावांचे आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सामन्यातील पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात उपयुक्त अशा नाबाद ३९ धावा करणाऱ्या ध्रुव जुरेल याला सामनावीराचा किताब देण्यात आला. असे असले तरी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने मात्र या विजयानंतर एकूण ७ खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय संघाने दबावाच्या परिस्थितीतून पुन्हा एकदा वाट काढली आणि संघर्ष करत सामना जिंकला. यातून भारतीय संघाची मानसिकता आणि वैचारिक सामर्थ्य दिसून येते. कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यातील पहिली स्पेल आकाशदीपने सुंदर टाकली. ध्रुव जुरेलने फलंदाजी करताना पिचचा नीट अंदाज घेतला आणि फूटवर्कही खूप चांगल्या प्रकारचे दिसले. कुलदीप यादवसोबतची त्याची पार्टनरशिप भारतासाठी निर्णायक ठरली. तसेच ध्रुवने दुसऱ्या डावातही उपयुक्त खेळी केली. कुलदीप यादवने दुसऱ्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली."
"सिनियर खेळाडूंनीही आपली कामगिरी चोख पार पाडली. अश्विन, जाडेजा आणि रोहित शर्मा यांनी आपापली जबाबदारी उत्तमपणे बजावली. यात विशेष कौतुक म्हणजे शुबमन गिलने संयमी खेळी करत धावांचा पाठलाग केला आणि अतिशय उपयुक्त असे अर्धशतक ठोकले. टीम इंडियाने सामना आणि मालिका दोनही जिंकल्याचा मला भरपूर आनंद आहे," असेही सचिनने ट्विटमध्ये म्हटले.