नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीचा तो भ्याड हल्ला कोणीच कधीही विसणार नाही. पुलवामा येथे झालेल्या या हल्ल्यात भारताने 40 जवान गमावले... त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आज संपूर्ण देश उभा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या कुटुंबीयांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग या माजी क्रिकेटपटूंबरोबरच बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. यामध्ये आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे आणि ते नाव म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकरचं... महान फलंदाज तेंडुलकरनं पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी 15 लाखांचा निधी गोळा केला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या तेंडुलकरने #KeepMoving Push-up Challenge मोहिमेंतर्गत दहा 'पूश-अप्स' मारून 40 शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी 15 लाख रुपयांचा निधी गोळा केला.
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल.'' त्याच्यासह गौतम गंभीरनेही शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली होती.
यात तेंडुलकरही सहभागी झाला. तो म्हणाला,''या मोहिमेतून जो निधी गोळा केला जाईल, तो शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिला जाईल. यामागच्या भावनांचा तुम्ही आदर कराल आणि या उपक्रमात आमच्यासोबत याल, अशी आशा करतो.''
पाहा व्हिडीओ...