Sachin Tendulkar ECI National Icon: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांसह भारतीय निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरची "राष्ट्रीय आयकॉन" म्हणून निवड केली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकारणाच्या मैदान गाजवताना दिसणार आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ECI ने गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती. त्यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माजी कर्णधार एम.एस. धोनी, अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना देखील ECI ने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडले होते. यंदा निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची 'नॅशनल आयकॉन' म्हणून निवड केली आहे.
सचिन तेंडुलकर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणार आहेत. उद्या, 23 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या उपस्थितीत ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून सचिन 'नॅशनल आयकॉन' म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.
या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत 3 वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. विशेषत: तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सचिनची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाद्वारे निवडणूक आणि सामान्य जनता, विशेषतः तरुण आणि शहरी लोकांमधील दरी भरुन काढण्याचे काम केले जाईल.