रोहित नाईक, नेरुळ : ‘मी माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक खेळांचा आनंद घेतला आहे. कारण प्रत्येक खेळ आपल्याला नवी गोष्ट शिकवतो,’ असे मत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील क्रीडा अकादमी येथे सचिनने आपल्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या पहिल्या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. क्रिकेटसह इतर खेळांमधूनही फायदा मिळाल्याचे सांगताना सचिनने सांगितले की, ‘लहानपणी मला टेनिस व क्रिकेट खूप आवडायचे. आजही मी वेगवेगळे खेळ खेळतो. टेबल टेनिस खेळल्याने माझी नजर तीक्ष्ण झाली, हाताच्या हालचालींमध्ये चांगली सुधारणा झाली. त्यामुळेच मला युवांना समजावून सांगायचे आहे की, तुम्ही विविध खेळ खेळा. प्रत्येक खेळातून मिळणारे फायदे जाणून घ्या.’
तंदुरुस्तीचा संदेश देताना सचिन म्हणाला की, ‘आपण नेहमी आरामात बसून दुसºयांसाठी टाळ्या वाजवतो, पण आपण स्वत: कधी खेळायला सुरुवात करणार? प्रत्येकानेच स्पर्धात्मक खेळ खेळावे, असे मी मुळीच म्हणणार नाही, पण प्रत्येकाने एक तरी खेळ नक्की खेळला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल.’
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरच्या अनुभवाविषयी सचिनने म्हटले की, ‘निवृत्तीनंतर मला सर्वात महत्त्वाची गोष्ट करता येते, ती म्हणजे, ज्यांनी मला इतकी वर्षे पाठिंबा दिला, त्यांना मी भेटू शकलो. ज्या ठिकाणी क्रिकेट सामने आयोजित होत नाहीत, अशा अनेक ठिकाणी प्रवास केला आणि तेथील लोकांचे अनुभव जाणून घेतले. दोन दिवसांपूर्वीच मी ताडोबाला गेलो होतो. सामने पाहताना त्यांच्या भावना काय होत्या हे कळले. अशा अनेक लोकांना भेटून वैयक्तिकरीत्या मला धन्यवाद म्हणता येतं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.’
सच्चू ते भारतरत्न.. स्वप्नवत प्रवास
‘साहित्य सहवासामध्ये लहानपणी हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, हँड टेनिस, लगोरी, आबाधुबी असे अनेक खेळ खेळलोय. झाडांवरून उड्या मारल्यात. या सर्व आठवणींनी माझा प्रवास स्पेशल झाला आहे. ही माझ्या आयुष्यातील पहिली इनिंग होती. सेकंड इनिंग शिवाजी पार्कमधून सुरू झाली. येथूनच मी अनेक आव्हानांचा सामना केला. येथे मिळालेले अनेकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मी भलेही फलंदाजीला एकटा जायचो, पण त्याच वेळी माझ्यासोबत माझी टीम आणि करोडो देशवासीयही फलंदाजीला जायचे. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते,’ असेही सचिनने आपल्या आयुष्याच्या प्रवासाबाबत सांगितले.
Web Title: Sachin Tendulkar Exclusive: you can learn new which from each games
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.