महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समाजसेवेतही आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा तेंडुलकर निवृत्तीपूर्वी आणि नंतरही समाजसेवा करत आहे. अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या तेंडुलकरनं देशातील सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराच्या खर्चासाठी निधी दिला आहे. गंभीर आजाराशी संघर्ष करत असलेल्या मुलांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबीयांना उचलता येत नाही, अशा गरजूंना ही मदत मिळणार आहे.
कोरोना संकट काळात तेंडुलकरनं महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळ नाडू आणि आंद्र प्रदेश येथील १०० मुलांना आर्थिक मदत केली आहे. एकम फाऊंडेशनच्या मदतीनं तेंडुलकरनं या मुलांची माहिती मिळवली आणि त्यानंतर तेंडुलकर फाऊंडेशननं मदत केली. ''सचिन तेंडुलकर फाऊंडेशनसह काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आरोग्य विभागात सचिन चांगलं काम करत आहे,''असे एकम फाऊंडेशनच्या अमिता चॅटर्जी यांनी सांगितले.
यापूर्वी तेंडुलकरनं आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत केली आहे आणि वंचित कुटुंबातील 2000 मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आसामच्या चॅरिटेबल हॉस्पिटलला तेंडुलकरनं मेडिकल उपकरणं दान केलं आहेत. आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील माकुंडा हॉस्पिटलमध्ये मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी उपकरणं त्यानं दान केली आहेत. नवजात बालकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
माकुंडा हॉस्पिटलचे बाल विशेषज्ञ सर्जन डॉ विजय आनंद इस्माइल यांनी सचिनचे आभार मानले. त्यांनी सांगितले की,''सचिन तेंडुलकर आणि एकम या सेवाभावी संस्थेच्या मदतीने हॉस्पिटलला मोलाची मदत झाली आहे. यामुळे गरीब लोकांना कमी पैशांमध्ये चांगला सुविधा मिळू शकतील.'' बॅट कारागीर अश्रफ चाचांच्या मदतीला धावला सचिन; उपचारांसाठी आर्थिक मदत करणार
तेंडुलकर हा UNICEFचा गुडविल अॅम्बेसिडर आहे. याशिवाय तेंडुलकरचे फाऊंडेशन मध्य प्रदेशातील आदीवासींना पोषक आहार व शिक्षण पुरवण्याचे काम करते. तसेच उत्तर-पूर्व भागातील अनेक वंचित भागांमध्ये ही फाऊंडेशन काम करते.
तेंडुलकरनं 200 कसोटीत 15921 धावा केल्या आहेत. कसोटीत 15 हजार धावांचा पल्ला पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. शिवाय 463 वन डे सामन्यांत 44.83च्या सरासरीनं 18426 धावा केल्या आहेत. त्यात 49 शतकांचा समावेश आहे. वन डे द्विशतक झळकावणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे.