Arjun Sachin Tendulkar, IPL 2023: भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमध्ये २४ वर्षांचे समृद्ध असे करियर गाजवले. सचिनने तुफान फलंदाजीच्या जोरावर विविध विक्रम मोडले. सचिनच्या नंतर आता पुढची पिढी म्हणजे त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच त्याने IPL या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले. कोलकाता नाइट रायडर्स विरूद्ध त्याने २ षटाकात १७ धावा दिल्या. तर हैदराबाद विरूद्ध दडपणाखाली असताना संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच सचिनने आपल्या ट्वीटरवरून काही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या उत्तरांमध्ये अर्जुनबद्दलचा प्रश्न आणि त्यासंबंधीचे उत्तरही होते.
अनेक सेलिब्रिटी आपल्या ट्विटर अकाऊंवरून चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी काही वेळ प्रश्नोत्तरांचा खेळ खेळतात. सचिनने देखील शुक्रवारी असंच एक खेळ खेळला. AskSachin या नावाने सचिनने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या प्रश्नांची उत्तरे देताना सचिनने अनेक मजेशीर प्रश्न आले. त्यातच त्याला मुलगा अर्जुन तेंडुलकर बद्दलही काही प्रश्न आले. त्यापैकी एका प्रश्नाची विशेष चर्चा रंगली. एका चाहत्याने सचिनला विचारले की, अर्जुनने जेव्हा सांगितले होते की त्याला क्रिकेटमध्येच करियर करायचे आहे त्यावेळी तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? त्यावर सचिन म्हणाला, मी त्याला सर्वात आधी तीन शब्दांत विचारलं होतं की.. "ARE YOU SURE????????" (तुझा हा निर्णय पक्का झालाय का?)
रोहित-अर्जुनचा फोटो पाहून काय वाटलं?
याशिवाय एका चाहत्याने दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोमध्ये रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर दोघे मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये एकमेकांना मिठी मारून सेलिब्रेशन करत होत. तर दुसऱ्या फोटोत रोहित शर्मा आणि अर्जुन तेंडुलकर एकमेकांना मिठी मारून विजयाचा आनंद साजरा करत होते. या दोन फोटोंकडून पाहून तुला काय वाटते? असे सचिनला विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला- माझी अशी इच्छा होतेय की आम्ही तिघेही एकत्र एकाच वेळी मुंबईच्या संघातून खेळायला हवं होतं.
विराटला काय सांगितलं होतं?
अजूनही बऱ्याच विषयांवर सचिन तेंडुलकरने चाहत्यांना उत्तरे दिली. २०११ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये सचिन बाद झाला आणि विराट कोहली मैदानात आला. त्यावेळी विराट मैदानात येत असताना सचिनने त्याला काय सांगितलं होतं, यावरही त्याने उत्तर दिले. तो म्हणाला की, मी विराटला सांगितलं होतं की चेंडू अजूनही स्विंग होतोय.