मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या गुरुंना मानवंदना दिली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. हे औचित्य साधून सचिनने आपल्या गुरुंचे स्मरण केले आहे. सचिन सध्या भारतामध्ये नसल्याचे म्हटले जात आहे. कारण सचिन इंग्लंडमध्ये विश्वचषकासाठी गेला होता. सचिनने विश्वचषकात समालोचनही केले होते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर खेळाडूंना सचिनच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.
सचिन मुंबईत नसला आणि फार मोठा सन्मान त्याला विश्वचषकात मिळाला असला तरी सचिन आपल्या गुरुंना विसरला नाही. सचिन महान क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आला. पण त्याला क्रिकेटचे धडे दिले ते रमाकांत आचरेकर यांनी. काही महिन्यांपूर्वी आचरेकर यांचे निधन झाले होते. त्यावेळी सचिनही त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होता. पण आचरेकर सर या जगात नसतानाही त्यांची आठवण सचिनने आजच्या खास दिवशी काढली आहे. सचिनने एक ट्विट केले असून यामध्ये त्याने आचरेकर सरांबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे.