आजपासून दिवाळीला सुरुवात झाली... लखलखत्या पणत्या, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी देशभरात पाहायला मिळणार आहे. पण, आजही देशातील असे अनेक भाग आहेत जेथे वर्षांचे बारा महिने हलाखिच्या दिवसांत अनेक कुटुंबीयांना उदनिर्वाह करावा लागत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी अनेक NGO कार्यरत आहेत. पण, दिवाळीच्या पहिल्या दिवशी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. तेंडुलकर विविध माध्यमातून समाजकार्य करत असतो आणि याची प्रचिती अनेकदा आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तेंडुलकरनं महाराष्ट्रातील इर्लेवाडी या दुर्गम भागातील मुलांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवलं.
तेंडुलकरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात तो इर्लेवाडीतील मुलांशी व्हिडीओ कॉलनं संवाद साधत आहे. त्यात त्यानं त्याच्या कारकिर्दीबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. तो म्हणाला,'' मी जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हाच क्रिकेटपटू बनण्याचं आणि टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. माझा हा प्रवास वयाच्या 11व्या वर्षी सुरू झाला. मला आजही आठवतंय की मी निवड समिती शिबिराला गेलो होतो, तेव्हा माझी निवडही झाली नव्हती. मला अजून मेहनत घ्यावी लागेल, असे मला सांगण्यात आले. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. त्यानंतर माझा निर्धार आणि मेहनत करण्याची तयारी वाढली. तुम्हाला काही साकारायचं असेल, तर शॉर्टकट वापरू नका.''
यावेळी विद्यार्थ्यांनी तेंडुलकरला काही प्रश्नही विचारले. क्रिकेटमधील यशाचे श्रेय कोणाला द्याल यावर तेंडुलकर म्हणाला, माझ्या कुटुंबीयांना. आई, भाऊ अजित, नितीन, बहीण सविता, लग्नानंतर अंजली, सारा, अर्जुन, काका-काकु आणि आचरेकर सर या सर्वांना श्रेय जाते.''
पाहा व्हिडीओ...