क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, कव्हर ड्राईव्हचा बादशाह... अशा नाना नावांनी ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्या बाबांच्या आठवणींना उजाळा देत एक भावनिक पोस्ट केली आहे. सचिन तेंडुलकर म्हणजे भारतीय क्रिकेटचा इतिहास असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ज्याची फलंदाजी पाहून लाखो तरूणांनी बॅट हातात घेतली ते नाव म्हणजे तेंडुलकर. आज 'क्रिकेटच्या देवा'ने आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट केली.
सचिनने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, बाबा आम्हाला सोडून गेलेल्याला २५ वर्षे झाली. पण आजही त्यांच्या या जुन्या खुर्चीवर बसल्यावर वाटते की, ते आजही आमच्यासोबत इथे आहेत. तेव्हा मी केवळ २६ वर्षांचा होतो, आणि आता माझे वय ५१ आहे. त्यांनी माझ्या आयुष्यावर आणि इतर अनेकांच्या जीवनावर किती प्रभाव पाडला हे मला अधिक स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या २५ व्या पुण्यतिथीला ४३ वर्षांनंतर या ठिकाणाला भेट देणे हे अत्यंत भावनिक होते. त्यांचे शहाणपण आणि त्यांचा दयाळूपणा मला सतत प्रेरणा देतो. बाबा, मला दररोज तुमची आठवण येते. मला आशा आहे की, तुम्ही माझ्यामध्ये जी मूल्ये रुजवलीत त्यानुसार मी जगत आहे.
सचिनचा गोलंदाजीतही विक्रम आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले.