Join us  

"तुझ्या प्रेमाच्या सावलीतच आम्ही सुखी आहोत", आईच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकर भावुक

जागतिक क्रिकेटला मास्टर ब्लास्टर देणाऱ्या माऊलीचा जन्मदिवस.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 7:22 PM

Open in App

भारतीय क्रिकेटला मास्टर ब्लास्टर देणारी माऊली म्हणजे रजनी तेंडुलकर. भारतरत्न सचिन तेंडुलकरची आई रजनी तेंडुलकर यांच्या जन्मदिवशी सचिनने खास चारोळ्या लिहित आपल्या आईला शुभेच्छा दिल्या. सचिनने जन्मदिवस साजरा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा सर्वांचे एकत्र  येणे ही सर्वांत चांगली गोष्ट आहे. आई आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू म्हणजे आमच्यासाठी जग आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, असे सचिनने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले.

तसेच तुझ्या प्रेमाच्या सावलीतच आम्ही सुखी आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई, अशा शब्दांत क्रिकेटच्या देवाने आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनच्या या पोस्टवर चाहत्यांसह विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी व्यक्त होत आहे.

दरम्यान, सचिनचा शंभर शतकांचा विक्रम अजून पर्यंत कोणालाही तोडता आलेला नाही. सचिनने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शंभर शतके ठोकली. सचिननंतर सध्या विराट कोहली ८० शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी २१ शतके करावी लागणार आहेत. सचिनने आपल्या कारकिर्दीत ५१ कसोटी आणि ४९ वन डे शतके ठोकली.

आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरऑफ द फिल्ड