मुंबई : पाच वर्षांचा फलंदाज एस. के. शाहीदचा फलंदाजीचा व्हिडिओ आईवडिलांनी समाजमाध्यमांवर व्हायरल करताच लाखो लोकांकडून त्याची वाहवा झाली. दुसरीकडे त्याचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरने या बालकाला आपल्यासोबत पाच दिवस सराव करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. शाहीदचे वडील हेअर सलूनमध्ये काम करतात.
मागच्या महिन्यात त्यांनी मुलाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केला होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची दखल तर घेतलीच शिवाय दिवंगत शेन वॉर्न याचे देखील लक्ष वेधले होते. वॉर्नने या मुलाचे अभिनंदन करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. वॉर्नचे नुकतेच ह्दयविकाराने निधन झाले. शाहीदचा आदर्श असलेल्या सचिनचे देखील या व्हिडिओने लक्ष वेधले. त्याने कोलकाता येथील शाहीदला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीत सराव करण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती. याठिकाणी सचिनने शाहीदला फलंदाजीचे धडे दिले.
शाहीदचे वडील समशेर म्हणाले,‘ माझा मुलगा पाच वर्षांचा आहे. सचिन त्याचा आदर्श आहे. सचिनला भेटण्याचे त्याचे स्वप्न होते. तो क्रिकेटपटू बनू इच्छितो. मात्र सचिनने त्याच्यासाठी जे केले त्यासाठी आभार हे शब्द देखील अपुरे पडतात. ट्विटर हॅण्डलवर मी हा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओला ऑस्ट्रेलियातील चॅनल फॉक्स स्पोर्ट्स, सचिन, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि वॉर्न यांनी टॅग केले होते. सचिनने हा व्हिडिओ पाहताच त्याच्या टीम मधील सदस्यांनी आमच्याशी संपर्क केला. शाहीद आणि त्याच्या कुटुंबीयांचा मुंबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च सचिनने केला आहे.