मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या खूप चर्चेत आहे. कारण सध्या तेंडुलकर कुटुंबात लगीन घाई सुरू आहे त्याचीच एक झलक सचिनने चाहत्यांसाठी शेअर केली आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन मंगळवारी आपल्या मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नात पारंपारिक वेशभूषेत दिसला. लग्नाच्या आधी सचिनने डोक्याला फेटा बांधला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर हा व्हिडीओ खुद्द सचिनने इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिनचा हा मराठमोळा अंदाज सर्वांचे लक्ष वेधत आहे.
तेंडुलकर कुटुंबात लगीन घाईइंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माजी मराठमोळ्या क्रिकेटपटूने म्हटले की, आज त्याचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर यांची मुलगी करिश्मा हिचे लग्न आहे आणि त्यामुळेच ते एकमेकांना फेटे बांधत आहेत, कारण त्यांना पारंपारिक वेशभूषेत लग्नात वावरायचे आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही सचिन तेंडुलकरने पारंपारिक पोशाख, लग्न आणि सेलिब्रेशन असे हॅशटॅग वापरले आहेत.
दरम्यान, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात नितीन तेंडुलकर चार भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. याच मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नात अर्थात सचिनच्या पुतणीच्या लग्नात तो मराठमोळ्या अवतारात वावरत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा सचिन जगभर प्रसिद्ध आहेच पण त्याला त्याच्या साध्या स्वभावामुळे देखील सर्वत्र ओळखले जाते. सचिन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो, सतत काही ना काही गोष्टी आपल्या चाहत्यांसाठी शेअर करून तो त्यांच्या संपर्कात राहत असतो.