नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. कोणताही सामान्य व्यक्ती या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकतो. भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. इथे खेड्यापासून ते शहरातील तरूणाईला क्रिकेटचे भलतेच वेड आहे. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या पोरांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे लक्ष वेधले आहे.
भन्नाट कॅचची क्रिकेटच्या देवाला भुरळ दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धेदरम्यानचा आहे. यात गोलंदाजाने टाकलेल्या वेगवान चेंडूवर फलंदाज जोरदार फटकार मारतो. खरं तर फलंदाजाने मारलेला हा चेंडू सीमारेषेपार चालला असतानाच संबंधित क्षेत्ररक्षकाने चपळाई दाखवली आणि षटकार वाचवला. सीमारेषेच्या काठोकाठ उभ्या असलेल्या खेळाडूने चेंडू झेलला, पण आपण सीमारेषेच्या बाहेर जाणार हे लक्षात आल्यानंतर त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला. लक्षणीय बाब म्हणजे फेकलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडणार हे लक्षात येताच क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या बाहेर येऊन कमाल दाखवली. एखाद्या दिग्गज फुटबॉलपटूप्रमाणे चेंडू पायाने सीमारेषेच्या आतमध्ये मारला मग सहकारी क्षेत्ररक्षकाने झेल घेतला. सीमारेषवर तैनात असलेल्या चतुर क्षेत्ररक्षकामुळे संघाला एक बळी घेण्यात यश आले.
'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन' करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याची भुरळ खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील पडल्याचे पाहायला मिळत आहे. सचिनने त्याच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ शेअर केला आहे. "फुटबॉल खेळायला येते अशा एखाद्या माणसाला तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आणता तेव्हा असे घडते", अशा आशयाचे कॅप्शन लिहून सचिननेही या भन्नाट क्षेत्ररक्षणाचा आनंद घेतला. बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील हा व्हिडीओ असल्याचे समजते. सध्या शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"