भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये बॉलिवूड कलाकारांसह खेळत आहे. क्रिकेटच्या मैदानात असामान्य कामगिरी करणारा सचिन म्हणजे अनेकांसाठी प्रेरणा... सचिनकडे पाहून अनेकांनी या खेळाला आपलेसे केले. या लीगमध्ये मास्टर ब्लास्टर जम्मू काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. या संघातील आमिर हुसैनची भुरळ क्रिकेटच्या देवाला पडली. आमिरचे शानदार क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिव्यांग असूनही क्रिकेटप्रती आमिरची असलेली जिद्द अनेकांना आकर्षित करणारी आहे.
सचिन तेंडुलकरने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिरचे तोंंडभरून कौतुक केले आहे. खरं तर आमिरला दोन्ही हात नाहीत मात्र तरीदेखील तो केवळ पायाने क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो. हे पाहून सचिन त्याचा मोठा चाहता झाला आहे. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर आमिरचा फोटो पोस्ट करत तू सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेस असे म्हटले. "आमिर हा खरा फिरकीपटू आहे, तो सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे", असे सचिनने म्हटले.
पहिल्या सामन्यात सचिनने आमिरची जर्सी परिधान केली होती. हे दोघेही एकाच संघाचे सदस्य आहेत. पहिल्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी सचिनने आमिरच्या संपूर्ण कुटुंबीयांना आमंत्रित केले होते. त्याला सचिनसोबत सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्याची संधी मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर शतकांचे शतक झळकावणारा सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि वन डेमध्ये ४९ शतके झळकावली.
गोलंदाज म्हणूनही सचिनच्या नावावर विक्रमआपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले.