मुंबई : ज्यांनी आपल्याला घडवलं, क्रिकेट विश्वामध्ये ज्यांच्यामुळे महान ठरलो, त्या प्रशिक्षक रमाकांच आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावुक झाला होता. यावेळी सचिनने एकदा आचरेकर सरांकडे पाहिले आणि त्याचा अश्रूंचा बांध फुटला.
आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. काल सायंकाळी त्यांच निधन झाले, त्यावेळी ते 87 वर्षांचे होते. घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली होती.
आज सकाळी आचरेकर सरांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. आचरेकर सरांच्या घरासमोर म्हणजे शिवाजी पार्क जिमखान्याच्या मागे आचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारासाठी एक गाडी ठरवण्यात आली होती. या गाडीमध्ये आचरेकर सरांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यावेळी सरांच्या पार्थिवाशेजारी त्यांचे सारे शिष्य उभे होते. सचिनही या गाडीमध्ये उपस्थित होता.
ही गाडी जेव्हा आचरेकर सरांच्या घराजवळून निघाली तेव्हा सचिनला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा गाडी सुरु झाली तेव्हा सचिनने आचरेकर सरांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यानंतर सचिनला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. एका हाताने त्याने आपले अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सचिन एवढा भावुक झाला होता की त्याला आपले अश्रू थांबवता आले नाहीत.
1932 सालचा आचरेकर सरांचा जन्म. त्यांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी यंग महाराष्ट्र एकादश, गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. पण, क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. आचरेकर सर घरातूनही कमीच बाहेर पडत. त्यांना 1990 साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2010 मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12 फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.