मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोविडमुळे आणखी एक मित्र गमावला आहे. सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत भारतीय संघाकडून खेळलेले विजय शिर्के यांचं कोविड संबंधिच्या आजारांमुळे ठाण्यातील रुग्णालयात निधन झालं आहे. ते ५७ वर्षांचे होते.
ऑक्टोबर महिन्यात सचिनचे जवळचे मित्र अवी कदम यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता विजय शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
"काही वर्षांपूर्वीच विजय शिर्के ठाण्याला राहायला गेले होते. कोविड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोविडवरही त्यांनी मात केली होती. पण इतर व्याधी बळावल्यामुळे त्यांचं निधन झालं", असं शिर्के यांच्या एका मित्राने सांगितलं.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १७ वर्षाखालील क्रिकेट समर कॅम्पचे विजय शिर्के दोन वर्ष प्रशिक्षकपदी होते.
भारतीय संघाचे माजी गोलंदाज आणि सध्याचे निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनीही विजय शिर्के यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सलील अंकोला यांनी त्यांच्या फेसबुकवर शिर्के यांच्या आठवणी जागवल्या आहेत.
"खूप लवकर गेलास मित्रा. इश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो. विजय शिर्केसोबतच्या खेळपट्टीवर आणि बाहेरील अशा खूप आठवणी आहेत. त्या कधीच विसरता येणार नाहीत", असं अंकोला यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे.