भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्घ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर मात्र रोहित दुखापतग्रस्त झाला. राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम असला तरी भारताने विराटच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेतील कसोटी मालिका तर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली वन डे मालिका गमावली. आता विंडिजविरूद्ध भारतीय संघाची रोहित-द्रविड परत एकत्र आली. या जोडीबद्दल महान फलंदाज सचिन तेंडुलकरने एक मोठं वक्तव्य केलं.
एका मुलाखतीत सचिनने त्याचं मत मांडलं. "या वर्षीच्या एप्रिल महिन्यात भारतीय संघाला शेवटचा विश्वचषक जिंकून ११ वर्ष पूर्ण होतील. नव्या विजयासाठी आता खूपच उशीर झालाय. मध्ये बराच कालावधी लोटलाय. माझ्यासह सारेच जण विश्वचषक विजयाची वाट पाहत आहेत. टीम इंडियाने विश्वकरंडक जिंकावा अशी साऱ्यांनीच इच्छा आहे. रोहित-द्रविड जोडी खूपच चांगली आहे. ते नक्कीच विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नांनी पराकाष्ठा करतील", असा विश्वास सचिनने बोलून दाखवला.
"विश्वचषक ही एक अशी स्पर्धा आहे ज्यासाठी सर्व क्रिकेटपटू खेळत असतात. त्यापेक्षा मोठी स्पर्धा कोणतीही नसते. टी20 क्रिकेट असो, वन डे असो किंवा कसोटी क्रिकेट असो; विश्वचषक स्पर्धा ही नेहमीच खास आणि मोठी असते", असेही सचिन म्हणाला.
"रोहित शर्मा आणि राहुल द्रविड दोघांची जोडी विलक्षण आहे. मला माहित आहे की ते लोक विश्वचषक विजयासाठी नक्कीच प्रयत्न करतील. ही जोडी क्षमतेनुसार सर्वोत्तम तयारी करेल. सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. जेव्हा तुमच्याकडे बरेच खेळाडू असतात त्यावेळी आणखी काय हवं? त्यामुळे यंदा चांगली कामगिरी केली जाईल असा मला विश्वास आहे", असंही सचिनने स्पष्टपणे सांगितलं.