मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांची खास भेट घेतली. यावेळी सचिनबरोबर भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्करही उपस्थित होते.
सचिनने उद्धव यांची भेट घेतल्याचे वृत्त काही मिनिटांपूर्वी सर्वत्र पसरले होते. पण सचिनने उद्धव यांची भेट का घेतली, याचे कारण मात्र समजत नव्हते. पण आता सचिनने उद्धव यांची का भेट घेतली याचे कारण समोर आले आहे. उद्धव यांचे पुत्र व वरळीचे आमदार आदित्य व तेजसदेखील यावेळी उपस्थित होते.
सचिन हा फक्त भारताचा महान क्रिकेटपटू नाही तर त्याला भारतरत्न या सर्वोत्तम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर सचिनने खासदारपदही भूषवले होते. त्यामुळे अशा मोठ्या लोकांची सुरक्षा महत्वाची समजली जाते.
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि उद्धव यांच्यामध्ये सुरक्षेच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. सचिनला 'एक्स' सुरक्षेच्या यादीतन वगळल्याची माहिती काही जणांना मिळाली होती. त्यासाठी सचिनने उद्धव यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. आपल्या सुरक्षेत वाढ करावी, अशी विनंती सचिनने उद्धव यांना केल्याचे समजत आहे. याबाबतची माहिती 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिली होती.