मुंबई : ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, त्याला भेटवस्तू दिल्या जातात. पण क्रिकेटच्या रणांगणात अपराजित अभिमन्यू ठरलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र आपल्या वाढदिवशी चाहत्यांनाच ' ही ' भेट दिली होती.
गोष्ट बरोबर 20 वर्षांपूर्वीची. 24 एप्रिल 1998. सचिनचा 25वा वाढदिवस होता. पण आधी लग्न कोंढाण्याचे... असे मानत सचिनने आपला वाढदिवस साजरा केला नाही. कारण त्यादिवशी भारत दोन हात करणार होता ते ऑस्ट्रेलियाशी. शारजामध्ये कोका-कोला चषकाचा अंतिम सामना होता. सचिनने यापूर्वीच्या सामन्यात आपल्या फलंदाजीच्या वादळापुढे ऑस्ट्रेलियाला नतमस्तक व्हायला भाग पाडले होते. त्यामुळे अंतिम फेरीत सचिन पुन्हा एकदा आपली चमक दाखवणार का? याची उत्सुकता साऱ्यांना होती.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 26 धावांत तीन धक्के बसले होते. पण कर्णधार स्टीव वॉ आणि डॅरेन लेहमन यांनी प्रत्येकी 70 धावांची खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 272 धावांपर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना भारताचा विजय निश्चित केला होता सचिननेच. पुन्हा एकदा त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. सचिनने नाबाद 134 धावांची खेळी साकारत भारतीयांना आपल्या वाढदिवशी विजयाची खास भेट दिली.